स्त्री शिक्षणाची सुरवात सावित्रीबाई फुले यांनी करून दिली आणि आज सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. देशाच्या निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाच्या पदावर आणि राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे. स्त्रिया आता लीलया अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहेत. नागरी प्रशासनातही स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. स्वप्ना जरग यांनी प्रशासनातील 22 महिला अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या कामासंबंधी, तसेच या कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी सेवेत असताना केलेले प्रयोग, हे सारे त्यांनी नेमकेपणाने मांडले आहे. या पुस्तकात विविध उच्च पदांवर काम करत असलेल्या, तसेच निवृत्त झालेल्या अशा अधिकाऱ्यांपैकी अशा 13 जणींशी त्यांनी संवाद साधला आहे. 2008 नंतर ही परीक्षा दिलेल्या 9 जणींचे मनोगत आहे. 2008 हे वर्ष निवडण्यामागचे कारण म्हणजे त्या वर्षीच्या आय.ए.एस.च्या 111अधिकाऱ्यांच्या तुकडीत 32 महिला होत्या. हा उच्चांक होता. या सेवेत नुकत्याच प्रवेश केलेल्या महिला अधिकाऱ्यांमध्ये संपदा मेहता, उज्ज्वला भागवत, मोक्षदा पाटील, नीलांबरी जगदाळे आणि शीतल उगले यांचा समावेश आहे. यांपैकी काही जणी सध्या राज्याबाहेर काम करत आहेत. पहिल्या भागात लीना मेहेंदळे, मीरा बोरवणकर, राणी जाधव आणि नीला सत्यानारायण तसेच व्ही. राधा आदींचा समावेश आहे. सेवेत नुकत्याच आलेल्या महिलांनी या सेवेकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगितला आहे; तसेच परीक्षा कशी द्यावी, कशी तयारी करावी याच्या टिप्स दिल्या आहेत. सेवेत येऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना या टिप्स उपयोगी पडतील. सेवेत विविध पदांवर काम केलेल्या ज्येष्ठ महिला अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा अनुभव सांगताना या सेवेत काय काळजी घ्यावी लागते व कशा कशाचा त्याग करावा लागतो, ते स्पष्ट केले आहे. जुन्या-नव्यांचा संगम साधणाऱ्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे- नेमकी शब्दरचना आणि निवडलेल्या विषयाशी प्रामाणिक राहून लेखिकेने या कार्यमग्न अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती मिळवली आहे आणि ती नेटकेपणाने सादर केली आहे. नागरी सेवेत नेमकेपणा लागतो आणि कसोटीच्या वेळी बुद्धीची परीक्षा पाहणारे प्रसंग येतात, तेव्हा त्या अधिकाऱ्याची क्षमता कळते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवरील पुस्तकही असेच नेमके व अचूक हवे होते. इथे या अधिकाऱ्यांच्या कामाचा व त्यांच्या कष्टांचा तपशील पद्धतशीररीत्या सादर झालेला आहे. शब्दांचा फाफटपसारा नाही आणि अलंकारिक वाक्ये वापरून कुठेही कादंबरीचा बाज आणलेला नाही. तरीही हे पुस्तक वाचनीय आणि नागरी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी झाले आहे. या पुस्तकातील अनेक अधिकारी महिला या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत, तर काही अधिकारी महिलांनी लग्नानंतर सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून ही परीक्षा दिली आहे. त्यांच्या यशातून अनेकांना स्फूर्ती मिळायला हरकत नाही. कठोर मेहनत आणि योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले, तर या परीक्षांचा हा अवघड गड जिंकणे शक्य आहे, असा विश्वास हे पुस्तक देते. पुस्तकाचे नाव - अधिकारिणी ... प्रशासनातील कर्तृत्वशालिनी लेखिका - स्वप्ना जरग प्रकाशन - सिनर्जी पब्लिकेशन्स, पुणे (020-65001045) पृष्ठे - 244, मूल्य - 280 रुपये. - प्रतिनिधी |
शनिवार, 9 मार्च 2013
नागरी सेवेतल्या स्त्रीशक्तीचा अभ्यासपूर्ण वेध
सदस्यता लें
संदेश (Atom)