शनिवार, 26 जून 2010

मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे -- Roop Kanwar- 1987

मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे
ON 4 th September 1987 at Deorala village of Sikar district in Rajasthan, India, she died (Sati? killed? under depression? ON 12 Mar 2004 ... A Special Court acquits all the 11 accused. )
Parts of this used for a lecture in Gyan Prabodhini sometime in 1987 immediately after the incidence. Later, revised after the verdict of Rajasthan High court. Published in Maha. Times. Hindi version appeared in Weekly Ravivar and is now included in my book Hai Koi Vakil Loktantra ka !
शेवटी एकदा रुपकुंवर सती केसचा निकाल लागला. (कि निक्काल लागला?)आणि न्यायालयाने निवाडा दिला की यांत कोणीही दोषी नाही- कुणीही तिची हत्या केली नाही. ती आपण होऊन सती गेली ! किती ती उदात्त ठरली !
ती सती गेली अगर घालवली, पण जाता जाता देशातल्या बुरसटलेल्या विचारसरणीवर बुरशीचा आणखीन एक जाड-जूड थर पसरवून गेली. आपल्या रुढीवादितेत भर टाकून गेली. स्त्रीच्या अबलापणाचे हे उदाहरण पाहून जेवढया लोकांच्या मनात आक्रोश उठला असेल त्यापेक्षा कित्येक पट जास्त लोकांना कित्येक पट तीव्रतेने अस वाटल की हाच नारीजीवनाचा आदर्श आहे आणी जिने हा आदर्श घालून दिला ती देवी झाली !

या घटनेच्या तमाम बातम्या वाचत असतांना जेवढी हळहळ मला रुपकुंवर आणी आपल्या समाजाबद्दल वाटली तेवढीच हळहळ वाटली एका पुराणकालीन महिलेबद्दल. कारण या सर्व प्रकरणांत तिच्यावर अन्याय होत आहे - तिची प्रतिमा डागाळत आहे, तिच्यावर कलंक फासला जात आहे !
ती दिव्य स्त्री आहे सावित्री. एरवी जी ही सावित्री नारी-शौर्याच प्रतीक आहे, चंडीपेक्षाही उग्र आणी उत्कट आहे, जेता आहे, मृत्युंजयी आहे, तिच्या नांवाचे दाखले देत देत, तिची माळ जपत-जपत, दुस-या एखाद्या स्त्रीला मूक, दुबळया-भित्र्या बलिदानाला भाग पाडल जातय यापेक्षा जास्त आपल्या समाजाची अधोगति कांय असू शकते ?
बालपणापासूनच सावित्री या व्यक्तिमत्वाने माझ्या स्वप्नदर्शी मनाचा पगडा घेतला होता. किशारोवस्थेत तर तीच माझी आदर्श झाली होती. तिच्या जीवनकहाणीतील कितीतरी आव्हानांनी माझ्या मनाला भुरळ घातली होती. ती एका विस्तीर्ण साम्राज्याची राज्यकन्या व एकुलती एक वारस होती. घोडेस्वारी, युध्दकला, शस्त्रप्रयोग आणी रथ संचालनात ती अत्यंत निपुण होती. वडिलांबरोबर युध्दाच्या आघाडीवर जात होती. त्याही काळात स्वयंवरे होत असत आणि स्त्रीला स्वत:चा पति निवडायचा अधिकार होता. पण एवढयावरच सावित्री संतुष्ट नव्हती. स्वयंवराला येणारे फक्त तिच्याशी लग्नाला इच्छुक असणारे पुरुष येणार. पण ती त्यांच्याशी लग्नाला इच्छुक असेलच अस कुठे आहे ? तेंव्हा ही स्वत:च वरसंशोधनाच्या मोहिमेला निघाली. निवड केली त्याकाळी अतिशिय दरिद्री व विपन्न अवस्थेत असलेल्या सत्यवानाची जो होता. त्याचे आई-वडिल वृध्द व अधू दृष्टिचे होते. सत्यवानाच्या समोर त्यावेळी एकच ध्येय होतं - आईवडिलांची सेवा करणे. इतर कुठल्याही कामासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. अस असूनही सावित्रीने त्याच्यात नेमक कांय पाहिल असेल की त्यामुळे त्याला पती म्हणून निवडावा? तिला कांय आत्मबलिदानाचं उदाहरण घालून द्यायच होत ? का लोकांना दाखवून द्यायच होत की स्त्रीने खाली मान घालून, आपले अश्रू मनांत कोंडून ठेवून दारिद्र्यांत जीवन कंठाव हाच तिच्या जीवनाचा आदर्श आहे? मुळीच नाही. तर मूळ कथेत असा उल्लेख आहे कि सत्यवानाची निवड करतांना सावित्रीने त्याच शील पाहिल तसेच त्याचं सत्यवादितेच, खरेपणाच व्रत पाहिल आणि पूर्वकाळातील त्याच्या शौर्याच्या आख्यायिकाही विचारांत घेतल्या. त्याच धैर्य आणी कष्टाला न कंटाळण्याच सामर्थ्य पाहिल. या सर्व गुणांचा विचार करुन मगच तिने सत्यवान हा आपला पति म्हणून निवडला.
निवड करुन सावित्री घरी परतली आणी आपल्रे मनोगत पित्याला सांगितले तेंव्हा खळबळ माजली. सत्यवानाची दरिद्री अवस्था हे एक कारण होतच. पण मुख्य म्हणजे ज्योतिषांनी असं भाकित वर्तवल की त्यांच्या शास्त्रानुसार सत्यवानाच्या कुंडलीत एका वर्षाच्या आत दुर्निवार मृत्युयोग आहे.
आपल्या अंधश्रध्दा निर्मूलनवाल्यांनी अजून ही गोष्ट वाचलेली नाही. त्यांना माहीत नाही कि सावित्रीने त्या काळात त्या ज्योतिषी मंडळींना चॅलेंज केल होत. तिने विचारल- माझ्या कुंडलीत तुम्हाला वैधव्य किंवा पतीवियोगाचा योग दिसत नाही ना ? मग झालं तर. मग मी याच्याशीच लग्न करणार. तुम्ही आपली बेरीज-वजाबाकी करीत बसा आणी ठरवा कुणाची कुंडली कशी प्रभावशाली ठरणार ते.
अशी सावित्री - एरवी दैनंदिन जीवनात आपल्या वडीलधा-यांचा आदर आणी मान ठेवणारी. पण गरज पडली तेंव्हा त्यांना चॅलेंज करू शकणारी. तिच्या चरित्रातला हा गुण पुढेही दिसून आलाच.
विवाहानंतर पित्याने सांगून पाहिले की तिची समस्त सासरमंडळी त्याच्याच राज्यांत, त्याच्याच घरी येऊन राहू शकतात. पण तेही सावित्रीने ऐकले नाही. जर सत्यवान राजपुत्र असूनही कष्टमय जीवनाला घाबरत नसेल, जर त्याचा हाच गुण तिला भावला असेल, तर तो गुण टाकून देण्याचा आग्रह सत्यवानाला का करायचा ? त्यापेक्षा स्वत: तो गुण उचलायला कांय हरकत आहे ? ती राजमजलातून निघून जलंगलातील झोपडीत रहायला आली. मात्र इतर स्त्रियांप्रमाणे फक्त घरांत बसून राहिली नाही. सत्यवानाबरोबर जंगलात जाऊन काम करु लागली. त्याचे कष्ट दोघांनी वाटून घेतले. आणी मला खात्री आहे की त्या कामाच्या त्रासापेक्षा सहवासाचा आनंद हाच दोघांना जास्त वाटला असणार.
आणी मग तो क्षण आला. सत्यवानाच्या देहातून आत्मा काढून नेण्यासाठी स्वत: यमराज आले. आपण सामान्य माणसं; मृत्युच्या कल्पनेनेच घाबरुन गेलो असतो - डोळे मिटून घेतले असते. पण तिच्यात हिम्मत होती. मृत्युच्या मागे आपण होऊन चालत जायची. ते बलिदान नव्हत, सती जाणं पण नव्हत. ते खुद्द यमराजावर पाळत ठेवण होत. स्वत: यमाने तिच्या निडरपणाची प्रशंसा केली आणी म्हटल की तू शूर आहेस, निडर आहेस, सत्यवादी आहे, म्हणून मला न भिता पाहू शकतेस आणी तुझ्याशी मी बोलावं यासाठी मला बाध्य करु शकतेस. आपल्या जगातल्या, कोणत्याहि धर्मग्रंथांत, इतिहासात, निडरपणाच अस दुसरं एकच उदाहरण मला सापडतं ते म्हणजे नचिकेत याच. त्याने यमराजालाच गुरू करून त्याच्याकडून सत्यधर्म काय ते शिकून घेतल. पण सावित्रीच्या बाबतीत तर यमराज हा शत्रूपक्ष होता.
आणि हे उदाहरण फक्त निडरपणाचच नाही. आशंकेच्या त्या वातावरणांत पण सावित्रीचे मन स्थिर होत आणि बुध्दि जागरुक होती. इथे तिच युध्दकौशल्य उपयोगाच नव्हतं. तिच्या बुध्दिचातुर्याचा मुकाबला होता - एका आकाशस्थ देवतेबरोबर. आपली जागरुक बुध्दि, विनम्रपणांतून यमराजाला गाफील करण आणि अखेरपर्यन्त टिकवून ठेवलेली चिकाटी आणि तर्कशुध्दता या बळावर तिने यमराजाला पराभूत केला. यम-सावित्री संवाद विवरण इथे मी सांगत नाही - कारण तो सर्वांना माहीत आहे. पण शेवटी यमराजाने सत्यावानाचा आत्मा त्याच्या देहात परत घातला. पुढे त्यांना सर्व ते-हेचे जय, यश, समृध्दि, राज्य मिळत गेले, ती कथा पण सर्वांना माहीत आहे.
पण त्या उपलब्धीच्या क्षणी सावित्रीचा आनंद कांय असणार ? मी खूपदा त्या विजयाची कल्पना करुन पाहिली. पण आपल्यापैकी कुणालाही अशा विजयाच्या जवळपास तरी जाता येईल कां? ती विजयिनी, गर्वाने मान उंच करुन परतली असेल. पुढला सर्व लखलखीत भविष्यकाळ ओढून पदरांत बांधून आणल्याचा उल्हास तिच्या श्रीमुखावर झळाळला असेल. अशा गर्वोन्नत स्त्रीच्या नांवाने दुस-या स्त्रीला मान खाली घालून जगायला आणी मान खाली ठेवूनच मरायला आपण शिकवतो. जिने मृत्युला जिंकले तिचे नांव घेऊन आपण दुस-या स्त्रीला दुबळेपणाने मृत्यूचा स्वीकार करायला भाग पडतो. तोच आदर्श आहे असं तिला व स्वत:ला पटवायचा प्रयत्न करतो. सती या शब्दाचा अर्थ आहे - जिच्यात सत्य आहे, सत्व आहे आणि स्वत्व आहे अशी स्त्री. जिच्यात हे गुण असतील ती स्त्री मृत्युंजय होण्याची अधिकारिणी आहे. तेच विशेषण आपण कुणाला लावतो ? तर अशा स्त्रीला जिला समाजाने दाबून टाकल आणी जी प्रतिकार करु शकली नाही. विजयाचे प्रतीक असलेल्या स्त्रीचे नांव घेऊन आपण इतर स्त्रियांना पराजय स्वीकारण्यासाठी भाग पाडतो.
असं म्हणतात की राजस्थानात प्रत्येक गांवात सती सावित्री मातेच मंदिर आहे. या मंदिरात जाणा-या प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्वत:वर ही अट घालून घेतली पाहिजे “मी मृत्युवर विजय मिळवण्याची दृढता बाळगत असेन तरच मला या मंदिरांत प्रवेशाचा हक्क आहे.”
-------------------------------------------------------------------------------------
Ref to my article on Sati
In the book
Backgrounder on the Women’s Movement in India
-by Shubha Chacko
brought out by the Centre for Education and Documentation (CED)
chapter VIII mentions about my article on Sati
See this link --
http://doccenter.org.in/docsweb/Gender/chapters/chapter8.htm
--------------------------------------------------------------------------------
https://sites.google.com/site/vaicharic/roopkunwar.pdf

मंगलवार, 11 मई 2010